नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य; ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

बेनोडा (शहीद) आरोग्य केंद्र व मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अमरावती, दि. २७: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन  प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीने राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गोर-गरीब रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाईल. याअंतर्गत ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य दिल्या जाईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बेनोडा येथे सांगितले.

वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सीजन प्लाँटचे भूमीपुजन तसेच मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, जि. प. सदस्य राजाभाऊ बोरकर, वरुड प. स. सभापती विक्रम ठाकरे, निनाताई गव्हाड, सरपंच श्रीमती कुबडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक श्री. पोतदार, डॉ. अमोल देशमुख, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची संभावना वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाने भर दिला आहे. आपली लढाई ही कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूशी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुणीही गाफील न राहता कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता तर डेल्टा प्लस नावाचा विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. राज्यात ह्या विषाणूचे संक्रमन झालेले 50 रुग्ण आहेत. मागील कालावधीत कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी आपल्या आप्त स्वकीयांना गमावले आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता कोरोना त्रीसूत्रीचे काटेकोर पालन करावे. सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. शासनाकडून लावलेल्या कोरोना निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर आघाडी शासन भर देत आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. याठिकाणी उपचार यंत्रणा सुसज्ज करण्यासह ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केल्या जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी शासन व आरोग्य विभागाकडून सर्व उपाययोजनांची तजवीज करण्यात येत आहे. ग्रामीण रुणालय यंत्रणा बळकट करण्यासाठी वरुड उपजिल्हा रुग्णालयाला अडीच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढेही वरुड तालुक्यासाठी नवीन रक्त पेढी आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येणार. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद केल्या जाईल, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

बेनोडा (शहीद) येथे ऑक्सिजन प्लांट

बेनोडा शहीद येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून दरदिवशी 44 ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार आहे. या आरोग्य केंद्रात 17 एप्रिलपासून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून 50 ऑक्सिजन बेडसची सुविधा करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे शंभर कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्रात उपचार करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिक्षक श्री. पोतदार यांनी दिली.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनीही सामायिक भाषन केले.  वरुड तालुक्यात नवीन रक्तपेढी निर्माण करण्यासाठी निधी, प्रस्तावित चार प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांना केली.

वणी ममदापूर येथील ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

तिवसा तालुक्यातील वनी ममदापूर ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. वनी ममदापूर येथील 9 लक्ष रुपयाच्या तांडा वस्तीच्या रस्ता बांधकामाचे पालकमंत्र्यांचे हस्ते भुमिपूजन, ग्राम पंचायतच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे सुध्दा लोकापर्ण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. गावात रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पांदण रस्ते आदी नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!