अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला वेग द्यावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 22 : शासनाच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पारदर्शी व गतीने पूर्ण होण्यासाठी याबाबतच्या अद्ययावत माहितीची आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
विविध विभागात अनुकंपा तत्वावर भरण्यात येणाऱ्या पदांच्या भरतीबाबत आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंड्या,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद निरवणे, अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयाचे उपायुक्त नितीन तायडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक श्री भुते, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रमेश गित्ते उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रतीक्षायादीनुसार पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती मिळाली पाहिजे. यासाठी सर्व विभागांतील रिक्त पदांची माहिती , प्रतीक्षा सूची अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करावे. ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
याबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घेऊन प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.