शाश्वत सिंचनासाठी विविध उपक्रम राबवू – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

बच्चू कडू यांच्या हस्ते बेलोरा येथे जलपूजन

अमरावती, दि. 14 : शेतीचे उत्पादन वाढून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे. शाश्वत सिंचनासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज बेलोरा येथे केले.

चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा, सालोरी व राजूरा अशा अनेक गावांत नदी खोलीकरणाची कामे राबविण्यात आली. पावसामुळे अशा ठिकाणी जलसंचय निर्माण होऊ लागला आहे. जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते बेलोरा या ठिकाणी जलपूजन करुन जलदेवतेला नमन करण्यात आले. यावेळी मंगेश देशमुख, स्वप्नील भोजने, सचिन पावडे, बबलू पावडे, मंगेश राऊत, श्याम कडू, अंकुश भोजने, प्रदीप देवले, मंगेश ठाकरे, गौरव झगडे पेडेकर, सरिताताई पावडे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी नदी नाल्याचे खोलीकरण, सिमेंट बंधारे, ढाळीचे बांध आदींच्या माध्यमातून पाण्याची बचत केल्यास याचा फायदा शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यास महत्वपूर्ण ठरते. सिंचनाअभावी कृषी उत्पादकतेवर प्रतिकुल परिणाम होतो.  मात्र, सिंचनाचे विविध उपक्रम राबवून ठिकठिकाणी जलस्त्रोत निर्माण झाल्यास रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पर्यायाने शेत पिक उत्पादनात वाढ होईल. त्यामुळे अशा अधिकाधिक उपक्रमांना चालना देण्यात येईल.

मागील वर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी जलसंपदा प्रकल्पातील पाणी बचतीसंबंधी नियोजन करण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिमेंट बंधारे, नदी, नाल्यांचे खोलीकरण उपक्रम आदी बाबींना चालना देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!