ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करू – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

दर्यापूर, अचलपूर उपविभाग  आरोग्य यंत्रणेची पाहणी\

ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण

दर्यापूर येथे ऑक्सिजन प्लान्टचे भूमिपूजन

अमरावती, दि. 11 : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक  आहे. त्यामुळे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन  प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीने राबवण्यात येत आहे. ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दर्यापूर येथे सांगितले.

दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सुधाकर पाटील भारसाकळे, तहसीलदार योगेश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष दाबेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर, श्री. पटोले व विविध मान्यवरांनी दर्यापूर व  अचलपूर उपविभागातील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात 58.60 लक्ष रुपये निधीतून ऑक्सिजन प्लांट आकारास येणार आहे. तालुका रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशनचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात येईल. त्याचप्रमाणे, आवश्यक तिथे व्हेंटिलेटर्स आदी आवश्यक सामग्रीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार वैद्यकीय मनुष्यबळही मिळवून देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.

कोरोना रोखण्यासाठी गत एका वर्षात विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावे. लसीकरण कार्यक्रमालाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कोविड केअर सेंटरला भेट

दौऱ्यात मान्यवरांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर, अचलपूरचे कुटीर रुग्णालय येथे भेट देऊन उपचार यंत्रणेचा आढावा घेतला व आवश्यक साधनसामग्रीबाबत माहिती घेतली.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन खबरदारी आवश्यक : श्री. पटोले

दुसऱ्या लाटेत सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढायला  सुरूवात झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुसज्ज उपचार यंत्रणेसह काटेकोर नियमपालन आवश्यक आहे. उपचार यंत्रणा बळकट होण्याच्या दृष्टीने कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश श्री. पटोले यांनी दिले. कोविडपश्चात दक्षतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सादरीकरण केले. तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, मो. नासिर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!