देश अंबानी,अदानींच्या हातात सोपवला जातोय, भविष्यात गंभीर परिणाम होतील -मेधा पाटकर

अमरावती

अंबानी आणि अदानींच्या हाती हा देश सोपवला जात आहे. याचे परिणाम भविष्यात फार गंभीर होतील. यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कृषी कायद्याविरोधातील आंदोलन हे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे आंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात देशातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बुधवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फासेपारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह या शाळेला भेट देण्यासाठी मेधा पाटकर अमरावतीत आल्या होत्या.

’नशामुक्ती ऐवजी भूकमुक्ती करावी’

नशा मुक्तीसाठी शासनाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले जातात. खरतर नशामुक्तीपेक्षा भुक मुक्ती आणि बेरोजगार मुक्ती ही काळाची खरी गरज आहे. कृषी कायद्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नाही, तर राशन धान्य दुकानावर अवलंबून असणार्‍या सामान्य नागरिकांचाही जेवणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे समाजाने आता जागृतपणे विचार करण्याची गरज असल्याचे मतही मेधा पाटकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

’असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भवितव्य धोक्यात’

कोरोना काळामध्ये अंबानी अदानी सारखे मूठभर उद्योजक श्रीमंत होत असून, अशा परिस्थितीतही शेती क्षेत्र त्यांच्याच घशात घालण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने रचले आहे. श्रमीकांच्या 44 कायद्यांपैकी 29 कायदे या सरकारने परत घेतले आहेत. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. भूमी अधिग-हण कायद्यामुळेही शेतकर्‍यांच्या जमिनी नष्ट होत आहेत. त्यामुळे सध्या सरकार केवळ जातीयवाद धर्मांधता याद्वारे सत्ता हस्तगत करू पहात आहे, अशी टीका मेधा पाटकर यांनी यावेळी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!