वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करा – पालकमंत्री यशोमती ठाकूर
वनाधिकारी स्व. विजय भोसले यांच्या ‘वृक्षधन’ ग्रंथाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अमरावती, दि. ५ : निसर्गाचे संतुलन ढळले की अनेक अरिष्टे उदभवतात. भौतिक प्रगती साधताना पर्यावरणाचे संतुलन राखले गेले पाहिजे. त्यामुळे आपल्या सुंदर वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
सेवानिवृत्त वनकर्मचारी संघातर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माजी वनाधिकारी स्व. विजय भोसले यांच्या ‘वृक्षधन’ पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.श्रीमती संध्या विजय भोसले, संजय जगताप, वनाधिकारी राजेंद्र पवार, अशोक कविटकर, श्याम मक्रमपुरे, संजय निंभोरकर, संतोष धापड, हरिभाऊ मोहोड आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
‘वृक्षधन’ हा मोलाचा दस्तऐवज
वनांमधील विविध वृक्ष, वनस्पतींची शास्त्रीय व उपयुक्त माहिती ‘वृक्षधन’ पुस्तकात समाविष्ट असून, माजी वनाधिकारी स्व. विजय भोसले यांनी आपला दीर्घ अनुभव, निसर्गाप्रतीचे प्रेम व जिज्ञासा याद्वारे परिश्रमपूर्वक हा ग्रंथ सिद्ध केला आहे. वनसंपदा व जैवविविधतेचे महत्व अधोरेखित करणारा हा ग्रंथ मोलाचा दस्तऐवज आहे. नव्या पिढीत पर्यावरणाप्रती आस्था जागविणे, पर्यावरणाचे महत्त्व तरुणाईच्या मनावर बिंबवणे यासाठी स्व. भोसले यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
वनविभागातर्फे वृक्षसंवर्धनाअंतर्गत शेवगा झाडाच्या बियाणे कीटचे वाटप विविध गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना यावेळी करण्यात आले. पार्डीच्या सरपंच वर्षाताई वानखडे, उपसरपंच प्रवीण ठवळी, वणी ममदापुरचे सरपंच श्री. पुनसे ग्रामसेवक श्री. डम्बाळे, दिवाणखेडचे सरपंच श्री. खताळे, श्री. इंगोले, नांदगावपेठ येथील जावेद इकबाल, मार्डा येथील ज्ञानेश्वर गावंडे आदी उपस्थित होते.