ई-पीक पाहणीला सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
अमरावती, दि. 20 : शासनाने राज्यातील पिकांच्या संदर्भासाठी ई-पिक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व पिकांची स्थिती आणि आकडेवारी एकत्रितरित्या उपलब्ध होण्यास मदत मिळेल. ही पिक पाहणी अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देण्यात येणाऱ्या मदत, नुकसान भरपाईसाठीही मदतीची ठरणार आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे गतीने राबवावी, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देऊन शेतकऱ्यांनीही पुढाकार घेऊन स्वत:च्या पिकांची स्थिती नोंदविण्याचे आवाहन केले.
आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्याक्ष बबलू देशमुख, आमदार किरण सरनाईक, बळवंत वानखेडे, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पांडा, पोलिस आयुक्त आरती सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक एन. हरीबालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपायुक्त संजय पवार, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोनाची स्थिती, पिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान भरपाई, गौण खनिज, संगणकीकृत सातबारा, ई-पिक पाहणी आदींबाबत आढावा घेण्यात आला.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही, आरोग्य यंत्रणांनी ही लाट ऑक्टोबरपर्यंत येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी खाटांची उपलब्धता, ऑक्सीजनची व्यवस्था यांचे नियोजन योग् पद्धतीने करण्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर द्यावा, सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी आरोग्य संस्थांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयातील खाटांची संख्या, औषधांचा पुरेसा साठा, यासोबतच ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करावे. अमरावती जिल्ह्यात 263 मेट्रीक टन ऑक्सीजन साठवणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सीजनच्या साठवणुकीसोबतच स्थानिक पातळीवर ऑक्सीजन निर्मिती करण्याबाबतची शक्यता पडताळून पहावी.
अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाखाच्या वर आहे. सध्यास्थितीत दोन्ही डोज घेतलेल्या नागरिकांची संख्या 10 लाखापर्यंत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यासोबतच चाचणीचा वेग वाढवावा. येत्या काळात डेल्टा या कोरोनाच्या प्रकाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी कोरोना संपूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत काळजी घ्यावी.
रेतीघाटाबाबत पर्यावरणविषयक मान्यता आणि जनसुनावणी वेळेत होण्याबाबत कार्यवाही करून प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात. कृषक जमिनींना अकृषक परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतीमान करण्यात यावी, असे आवाहन श्री. थोरात यांनी केले.
महसूल यंत्रणांना वाहने उपलब्ध करून द्यावीत, तसेच अमरावती तहसिल कार्यालयावरील ताण पाहता शहर व ग्रामीण परिसर यांच्यासाठी स्वतंत्र तहसिल निर्मितीच्या शक्यता तपासून प्रस्ताव सादर करावा, त्यामुळे अमरावती तहसिलवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळेल. शहर आणि लगतच्या परिसरात सातबारा आणि मिळकत पत्रिका अशी दुहेरी पद्धती अवलंबिली जाते, ही जाचक असल्यामुळे यामध्ये सुधारणा करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यांनी दिले.