आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासासह न्यायालयाने ठोठावला 45 हजारांचा दंड

अमरावती

वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासासह 45 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. देवेंद्र भुयार सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.

काय आहे प्रकरण –

सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या यशोगाथाचे काम 27 फेब-ुवारी 2013 रोजी सुरू होते. त्यावेळी देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेवून सभागृहात आले व जोरजोरात बोलू लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. दरम्यानच मला त्यांनी अर्वाच्च भाषेत आईवरुन शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली व माईक फेकून मारला, अशी आशयाची तक्रार वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांनी वरूड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून देवेंद्र भुयार यांच्यावर भादंविच्या 353, 186, 294, 506 गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती दोषारोपपत्र 15 एप्रिल 2013 रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणाचा तपास पीआय दिलीप पाटील यांनी केला.

विविध कलमांन्वये ठोठावली तीन महिन्यांची शिक्षा व 45 हजारांचा दंड –

जिल्हा न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी देवेंद्र भुयार यांना सोमवारी कलम भादंविच्या कलम 353 अन्वये तीन महिने सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच भादंविच्या कलम 294 अन्वये दोन महिने सक्तमजुरी व रुपये 10 हजार दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास, भादंविच्या कलम 506 अन्वये तीन महिने सक्तमजुरी व रुपये 15 हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरच्या तीनही शिक्षा त्यांना एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. सदरची रक्कम वसुल झाल्यानंतर 10 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादी राम लंके यांना देण्याचा आदेशही न्यायाधीशांनी दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील सुनित ज्ञानेश्वर घोडेस्वार यांनी यशस्वीरित्या युक्तीवाद केला.

उच्च न्यायालयात दाद मागणार –

2013 मध्ये झालेल्या एका प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल मान्य आहे. या निकाला विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!