पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप
अकोला,दि.२९ – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पनोरी ता.अकोट येथील दिवंगत मुरलीधर आनंदा बुटे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली.
मुरलीधर आनंदा बुटे यांचे नुकतेच गावच्या नाल्याच्या पुरात बुडून निधन झाले. आज पालकमंत्री ना.कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केले. बुटे यांचा मुलगा महेश व मुलगी वैष्णवी असे दोघेच वारस आहेत. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांनी सुपूर्द केला. या कुटुंबाला अन्य योजनांमधून मदत मिळवून देऊ,तसेच त्यांचे घराचे पुर्णतः नुकसान झाले असून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ. शिवाय मुलगा महेश याला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वस्त केले. पनोरी गावच्या नाल्याचे खोलीकरण, तसेच गावच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येतील,असेही ना.कडू यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती लताबाई नितोने, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, तहसीलदार निलेश मडके, गट विकास अधिकारी किशोर शिंदे तसेच अन्य अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
पूरग्रस्त गावांनजीक नाल्यांचे खोलीकरण प्राधान्याने
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना ना.कडू म्हणाले की, जिल्ह्यात जिथे जिथे नाल्याचे पाणी गावात शिरून पुरामुळे नुकसान झाले तेथे नाला खोलीकरण काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राधान्याने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.