पाथर्डीच्या एकनाथवाडीत एकाच दिवशी तीन बालविवाह, 33 नातेवाईकांवर गुन्हा दाखल
अहमदनगर,
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे रविवारी दि. 24 रोजी एकाच दिवशी तीन बालविवाह झाल्याचे उघडकीस आले आहे. चाइल्ड लाइन या सामाजिक संस्थेने या घटनेकडे लक्ष वेधल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी वर व वधूचे आईवडील, जवळचे नातेवाईक, पुरोहित, आचारी, मंडपवाले अशा एकूण 33 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
चाईल्ड लाईन संस्थेने उघड केला प्रकार –
चाइल्ड लाइन संस्थेला पाथर्डीतील एकनाथवाडी येथे रविवारी तीन बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही घटना एकनाथवाडीचे ग-ामसेवक भगवान भिवसेन खेडकर यांना कळवली. खेडकर यांनी घटनेची खात्री करण्यासाठी गावात भेट दिली. मात्र वर्हाडी लोकांनी त्यांना माहिती दिली नाही. त्यामुळे सोमवारी खेडकर यांनी मुलींच्या संबंधित शाळेत, आव्हाळवाडी (शिरूर कासार, बीड) व एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मुलींच्या वयाची खात्री केली. तिन्ही मुलींचे वय 14 वर्षे 3 महिने होते. त्यामुळे त्यांनी पाथर्डी पोलिसांकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 9, 10, 11 अन्वये फिर्याद दाखल केली.
पाथर्डी तालुक्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले –
एका गुन्ह्यात 10 दुसर्या गुन्ह्यात 12 व तिसर्या गुन्ह्यात 11 आरोपींचा समावेश आहे. दोन मुली एकनाथवाडी येथील आहेत तर एक मुलगी आव्हाळवाडी येथील आहे. आव्हाळवाडी येथील मुलीचा विवाहही एकनाथवाडीमध्येच आयोजित करण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यात यापूर्वीही एका अल्पवयीन मुलीचा दोनदा बालविवाह उघडण्याचा प्रकारही उघडकीस आलेला आहे. पाथर्डी तालुक्यात ऊसतोड कामगार वर्ग मोठा आहे. तसेच विविध भटक्या समाजाचे वास्तव्य तालुक्यात दुर्गम भागात आहेत. बंदी असूनही जात पंचायत भरवण्याचे प्रकार होतात ते पोलिसांना रोखावे लागतात. अशिक्षितपणा, गरिबी, परंपरेचा पगडा आदी कारणामुळे तालुक्यातील ग-ामीण भागात बालविवाह होतात अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.
बालविवाहाबद्दल ग-ामसेवकच अनभिज्ञ!
एकनाथवाडी येथे झालेले तीन बालविवाह एकाच दिवशी झाले. एक गावातील श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात, दुसरा मुलीच्या घरासमोर तर तिसरा मुलाच्या घरासमोर आयोजित करण्यात आला होता. मंगल कार्यालय भाड्याने घेऊन आयोजित केलेले विवाह सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास येतात. त्यामुळे दुर्गम भागात घरासमोर मंडप टाकून किंवा गावातील मंदिरातच बालविवाह गुपचूप आयोजित केले जात आहेत. त्यामुळे ते अशा बालविवाहांची पूर्व कल्पना ग-ामसेवकालाही नसते. वास्तविक असे विवाह रोखण्यासाठी ग-ामसेवक,सरपंच आदींची एक समिती गठीत असते. अनेकदा समितीचे दुर्लक्ष होते किंवा तेच अनभिज्ञ असतात. बहुतेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि संस्थांच्या सुचनेनंतर असे विवाह रोखले जातात किंवा उघडकीस येतात. त्यानंतर ग-ामसमितीने तक्रार केल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतात.