भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

तुतारीची ललकारी आणि जयघोषाने भारावले वातावरण

लोककल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करण्याचे केले आवाहन

हीरकमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेने मुलींसाठी जाहीर केल्या शिष्यवृत्ती योजना

स्वयंसहायता बचत गटाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही झाला शुभारंभ

अहमदनगर  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण चिरंतन राहावी आणि आपल्या सर्वांना प्रशासन चालविताना आपण जनतेसाठी आहोत, ही भावना कायम राहावी यासाठी या शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे औचित्य आहे. त्यामुळेच लोककल्याणाची भूमिका ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तुतारीचा निनाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात आज शिवस्वराज्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडला.

महाराष्ट्र शासनाने दिनांक 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी ९ वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा परिषद इमारतीचे आवारामध्ये आज झाला. यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, विविध विषय समिती सभापती सर्वश्री सुनील गडाख, काशीनाथ दाते, उमेश परिहर, मिराताई शेटे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद नवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री वासुदेव सोळंके, निखिल ओसवाल, परिक्षित यादव, संजय कदम यांच्यासह विविध पदाधिकारी-अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच महाराजा सयाजी गायकवाड यांच्या जिल्हा परिषद आवारातील  पुतळ्यासही मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी सारेच वातावरण जणू शिवमय होऊन गेले होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते स्वयंसहायता गटांनी उत्पादिन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ  करण्यात आला. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पदव्युत्तर विद्यार्थिनीसाठी राजमाता शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय घटकांतील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि दिव्यांग मुलींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझी वसुंधरा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचा सत्कार पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य सुरु झाले. त्यामुळेच आपला केंद्रबिंदू ही सामान्य जनता असावी. लोककल्याणाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी,  अधिकारी आणि इतर कर्मचार्‍यांमध्ये असावी, यासाठी ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला. आजपासून महाराष्ट्र शिवराज्यभिषेकाची आठवण या शिवस्वराज्य दिनानिमित्त चिरंतन जपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद अहमदनगरचे हे  हीरकमहोत्सवी वर्ष आहे. येथील इमारत आणि परिसराला ऐतिहासिक वारसा आणि संदर्भ आहेत. हीरकमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेने मुलींसाठी सामाजिक योजना जाहीर करुन ही परंपरा जपली आहे. खरोखरच येथील पदाधिकारी आणि सर्व अधिकारी या अभिनंदनास पात्र आहेत. जेथे महिलांना वाव देण्याचे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होते, तेथे नक्कीच प्रगती होते, असे ते म्हणाले.

ग्रामविकास विभागामार्फत स्वयंसहायता गटाच्या उन्नतीसाठी विविध प्रदर्शने भरवली जातात. गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे आपल्याला ती घेता आली नाहीत. येथील जिल्हा परिषदेने त्यासाठी साईज्योती ब्रॅंडच्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म या गटातील महिलांनी उत्पादिन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाटी उपलब्ध करुन दिला आहे, ही कौतुका्स्पद गोष्ट असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांनी ७० कोटी रुपायांची उलाढाल केली. आता निश्चितपणे ती शंभर कोटींच्या वर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनांच्या अंमलबजावणीतून महिलांच्या उन्नतीसाठी काम होणार असल्याचे सांगितले. बचत गटांना स्वावलंबनातून आर्थिक आधार देण्याचे काम आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी जि. प. अर्थ सभापती श्री. गडाख यांनी विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती दिली.

यावेळी शिवस्वराज्य दिन, जिल्हा परिषद हीरकमहोत्सव आणि साईज्योती ऑनलाईन प्लॅटफॉर्म शुभारंभाबाबत विशेष चित्रफीत दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भोर यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोळंके यांनी मानले, सूत्रसंचलन नीलेश दिवटे यांनी केले.

रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम

शिवस्वराज्य दिन कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी रुग्णवाहिका प्रदान करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करा

कोरोना प्रादुर्भाव अजून संपलेला नाही. मात्र, जिल्ह्याचा रुग्ण बाधितांचे प्रमाण आणि ऑक्सीजन बेडसची उपलब्धता या निकषांच्या बाबतीत आपला जिल्हा स्तर-एक मध्ये आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु होणार आहेत. मात्र, धोका संपलेला नाही.  दुसर्‍या लाटेत कोरोनाची भीषणता आपण अनुभवलेली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!