केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौमध्ये उत्तर प्रदेश राज्य न्यायवैद्यक संस्थेची केली पायाभरणी
नवी दिल्ली 01 AUG 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लखनौमध्ये उत्तर प्रदेश राज्य न्यायवैद्यक संस्थेची पायाभरणी केली.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, विस्तृत संकुल असलेल्या उत्तर प्रदेश राज्य न्यायवैद्यक संस्थेची एक भव्य सुरुवात होईल. अनेक विद्यार्थी येथे संशोधनात सहभागी होतील आणि केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणांचा कणा बनतील. गृहमंत्र्यांनी सांगितले की, लखनौमध्ये बांधण्यात येणाऱ्या उत्तर प्रदेश राज्य न्यायवैद्यक संस्थेवर सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जातील. यासह, भारत सरकारने येथे अत्याधुनिक डीएनए केंद्र बांधण्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अमित शाह पुढे म्हणाले की, सुरुवातीला दरवर्षी सुमारे 150 विद्यार्थी या संस्थेतून पदवीधर होतील आणि 350 पेक्षा जास्त शिक्षकवर्ग येथे कार्यरत असेल.
अमित शाह म्हणाले की, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी देखील आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील टिळकांचे योगदान इतिहास आणि आगामी अनेक पिढ्या कधीही विसरू शकत नाहीत. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे सांगणारे लोकमान्य टिळक हे पहिले व्यक्ती होते. या घोषणेने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरला. आज मी टिळकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आशा करतो की, येणाऱ्या पिढ्या त्यांच्या तत्त्वांच्या आणि देशभक्तीच्या भावनेने देशाला पुढे नेतील.