नोवाक जोकोव्हिचचे गोल्डन स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले
टोकियो
30 जुलै
टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत उलटफेर टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये पाहायला मिळाली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोवाक जोकोव्हिचला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चौथ्या मानांकित जर्मन खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेवने त्याला पराभूत केले. या पराभवामुळे जोकोव्हिचचे पहिले ऑॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम जिंकण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. एका कॅलेंडर वर्षात चार मुख्य गडस्लॅमसह ऑॅलिम्पिक सुवर्ण जिंकण्यासाठी जोकोव्हिच प्रयत्न करत होता. पण त्याचा स्वप्नभंग ज्वेरेवने केला आहे.
दोन तास रंगलेल्या या सामन्यात ज्वेरेवने 1-6, 6-3, 6-1 असे जोकोव्हिचला हरवले. सामन्याच्या सुरुवातीला जोकोव्हिचने शानदार खेळ दाखवला आणि अवघ्या 37 मिनिटांत पहिला सेट जिंकला. त्यानंतर ज्वेरेवने जोरदार पुनरागमन करत 45 मिनिटांत दुसरा सेट यानंतर, शेवटच्या सेटमध्येही ज्वेरेवने जोकोव्हिचला कोणतीही संधी दिली नाही आणि त्याच्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. ज्वेरेवने शेवटचा सेट 41 मिनिटांत जिंकला. या विजयासह जर्मनीचा हा खेळाडू अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला. त्याचा जोकोव्हिचविरुद्ध नऊ सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे.
ज्वेरेवचा आता विजेतेपदाचा सामना रशियाच्या ऑॅलिम्पिक समितीच्या 12व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हशी होईल. त्याचबरोबर, जोकोव्हिच आणि स्पॅनिश खेळाडू कॅरेनो बुस्टा यांच्यात कांस्यपदकासाठी लढत रंगणार आहे.