३ ऑगस्ट रोजी विधिमंडळात ‘समर्पण ध्यानयोग’ या एकदिवसीय शिबिराचे आयोजन

मुंबई, दि. ३० : सन्माननीय विधिमंडळ सदस्य यांच्यासाठी ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते १.३० या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी शिवकृपानंद महाराज यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ध्यान प्रात्यक्षिक हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

वाढते मानसिक ताणतणाव आणि कोविड १९ च्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ध्यानसाधना पूरक ठरत आहे. त्या दृष्टीने सर्वांना प्रेरक आणि पथदर्शी ठरेल असा हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यास सर्व सन्माननीय सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत यांनी केले आहे. कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून हा कार्यक्रम होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!