प्रियांकाचा मुंबईतील घरं विकण्याचा सपाटा; कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई प्रतिनिधी

27 जुलै

प्रियांका चोप्रा गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत आहे. निक जोनाससोबत तिने विवाह केल्यानंतर दोघेही अमेरिकेतल्या लॉस एंजलिस इथे स्थायिक झाले आहेत. अलिकडच्या काळात प्रियांकाचं भारतात येणंही कमी झालं आहे. पण ती भारतात येणार आहे. कारण, इथे तिची आई मधू चोप्रा राहतात. पण आता मात्र प्रियांकाने एक निर्णय घेतल्याचं समोर आल्यानं ती पुन्हा मुंबईत येणार की नाही, वा आता ती नवं काय पाऊल टाकणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

प्रियांका अमेरिकेत जरी राहात असली तरी तिची मुंबईत बरीच प्रॉपर्टी आहे. तिचा एक जुहूमध्ये असलेला बंगला तिने जॅकलिन फर्नांडिसला भाड्याने राहायाला दिला आहे. शिवाय तिच्या इतरही काही प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या दोन प्रॉपर्टी प्रियांकाने विकल्या आहेत. वर्सोवा इथे राज क्लासिक इथले दोन आपर्टमेंटस तिने विकल्याची बातमी आहे. या दोन्ही प्रॉपर्टीची मिळून सात कोटी रक्कम होते. शिवाय, ओशिवरा इथे असलेलं एक ऑॅफिसही तिने 2 लाख 11 हजार रुपयांसाठी भाड्याने दिलं आहे.

खरंतर प्रियांकाला घरं घ्यायला खूप आवडतात. पण आता मात्र तिने घरं विकण्याचा सपाटा लावला आहे. याच्यामागंच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. प्रियांका तर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत राहते. इथले सगळे व्यवहार तिची आई मधू चोप्रा पाहतात. त्यांनीच हे विक्रीचे व्यवहार केले. प्रियांका लवकरच अमेरिकेतून काही दिवसांसाठी भारतात येईल असं कळतं. निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचा अमेरिकेतला व्याप वाढला. तिची अनेक हॉलिवूडच्या कार्यक्रमांना हजेरी लागू लागली. यामुळे प्रियांका जगभरात पोचली हे खरं आहे. पण भारतीयांना मात्र ती हिंदी सिनेमात कधी दिसणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रियांका सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करते आहे. केवळ हिंदी, इंग-जीच नाही तर मराठीमध्येही तिने अनेक सिनेमे प्रोड्युस केले आहेत. सध्या आदिनाथ कोठारेचं दिग्दर्शन असलेला पाणी हा सिनेमाही तिने प्रोड्युस केला आहे. हा सिनेमा पूर्ण झाला आहे. लॉकडाऊनमुळे जे अनेक सिनेमे थांबले आहेत, त्यातलाच एक हा सिनेमा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!