पृथ्वी शॉ ओपनिंगचा पर्याय, सूर्याला या क्रमांकावर संधी!

मुंबई प्रतिनिधी

26 जुलै

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला धक्का लागला आहे. शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाले आहेत. या खेळाडूंच्या बदली पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला रवाना होणार आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या श्रीलंकेत टी-20 सीरिज खेळत आहेत.

शुभमन गिल टेस्ट सीरिजमधून बाहेर झाल्यावर रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण खेळणार? हा प्रश्न उपस्थित झाला होता. मयंक अग-वाल आणि अभिमन्यू इश्वरन बॅक अप ओपनर म्हणून इंग्लंडमध्ये आहेत, पण सध्याचा फॉर्म बघता पृथ्वी शॉचा ओपनिंगचा दावा मजबूत दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये शॉने 3 सामन्यांमध्ये 105 रन केले होते.

पृथ्वी शॉला ऑॅस्ट्रेलिया दौर्‍यातल्या खराब कामगिरीनंतर टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही पृथ्वी शॉला डच्चू देण्यात आला होता. यानंतर पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये धमाका केला. विजय हजारे ट्रॉफीच्या 8 इनिंगमध्ये त्याने विक्रमी 827 रन केले. लिस्ट ए क्रिकेटच्या 20 इनिंगमध्ये त्याने 72.94 च्या सरासरीने 1,240 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता.

मयंक अग-वालने सराव सामन्यात 47 रन केले होते. पहिल्या टेस्टमध्ये मयंकच रोहितबरोबर ओपनिंगला येईल, कारण 29 जुलैला श्रीलंकेविरुद्ध अखेरची टी-20 खेळून पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होईल, यानंतर त्याला नियमानुसार 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. 4 ऑॅगस्टपासून पहिली टेस्ट सुरु होणार असल्यामुळे तो दुसर्‍या टेस्टपासून उपलब्ध असेल.

सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये मधल्या फळीत खेळू शकतो. याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आपल्या कामगिरीने छाप पाडली. सूर्याने 77 प्रथम श्रेणी सामने खेळले, यात 71 रणजी ट्रॉफीच्या मॅच आहेत. पाचव्या क्रमांकासाठी सूर्याला हनुमा विहारी आणि केएल राहुलकडून आव्हान मिळू शकतं. केएल राहुलने सराव सामन्यात पाचव्या क्रमांकावर खेळताना शतक केलं होतं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!