टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीच्या कुटुंबियांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
मुंबई प्रतिनिधी
दि. २६ : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंपैकी चिराग शेट्टी हा मुंबई उपनगर जिल्ह्यातील बॅडमिंटनपटू (पुरूष दुहेरी) आहे. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशाने चिराग यांचे वडील चंद्रशेखर शेट्टी, काका चंद्रेश आणि भाऊ शशांक या कुटुंबियांचा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींच्या वतीने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उप जिल्हाधिकारी विकास नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या सेल्फी पॉइंटचे श्री ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
चिराग शेट्टी यांनी आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य संपादन केले असून ते केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी आहेत.