महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत भारतीय सेनेच्या तिन्ही सेवांद्वारे पूर निवारण कार्य सुरु

मुंबई–

ठळक वैशिष्ट्ये:

•भारतीय लष्कराच्या टास्क फोर्सद्वारे महाराष्ट्रातील सर्वाधिक तीन पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बचाव आणि  मदतकार्य सुरू

•कर्नाटकात भारतीय नौदलाच्या पथकाने 200 हून अधिक लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले.

•सुमारे 400 एनडीआरएफ कर्मचाऱ्यांना भारतीय हवाई दलाने बाधित भागात आकाशमार्गे पोहोचवले

•अधिक बचाव पथके आणि  विमाने यासाठी तयार 

भारतीय सेनेच्या  तिन्ही सेवांनी नागरी प्रशासन आणि राष्ट्रीय तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबरोबर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या पूरग्रस्तांसाठी मदत आणि  बचाव कार्य सुरू केले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली या सर्वाधिक बाधित भागातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाशी सुयोग्य समन्वय साधून भारतीय सैन्याने पायदळ , इंजिनिअर्स, दळणवळण, बचावकार्य आणि वैद्यकीय पथके यांचा समावेश असलेली कृतीदले या बाधित झालेल्या  क्षेत्रात तैनात केली आहेत. या पथकांनी आपल्या बचाव आणि  मदतकार्याने  चिपळूण, शिरोळ, हातकणंगले, पलूस आणि मिरज भागात अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

कर्नाटकात भारतीय नौदलाने नेव्हल डायव्हर्स, रबराच्या ‘जेमिनी’ बोटी, लाइफ जॅकेट्स आणि पूर मदत कार्यांसाठी वैद्यकीय उपकरणे यासह सात सुसज्ज पूर मदत पथके कार्यरत  केली आहेत. या पथकाने कादरा धरणाजवळील सिंगुड्डा आणि भैरे या गावातून 165 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले, तर 70 लोकांना कैगाच्या सखल भागातून बाहेर काढले.

नेव्हल सीकिंग, प्रगत लाइट हेलिकॉप्टर्स आणि भारतीय वायुसेना एमआय -17 हेलिकॉप्टर्स यांनी मिळून अनेक उड्डाणे केली आणि पाण्याच्या पातळीत अचानक आणि प्रचंड वाढ होऊन अडकलेल्या लोकांची सुटका केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच बचाव आणि  मदत कार्याची योजना आखण्यासाठी त्यांनी बाधित भागाचे अनेकदा हवाई सर्वेक्षण केले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ)  सुमारे 400 जवानांना भुवनेश्वर, कोलकाता आणि वडोदरा येथून महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी तसेच गोवा येथे 40 टन बचाव सामुग्रीसह विमानाने पाठवण्यात आले.

या तिन्ही सेवांची  पथके पूरग्रस्त भागातील स्थानिकांना वाचवण्यासाठी तसेच त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत.याव्यतिरिक्त  अधिक बचाव कार्यपथके  आणि विमाने तैनात आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!