पुण्यात भाजपच्या ‘विकासपुरूष’ला राष्ट्रवादीचे ‘कारभारी लयभारी’ने प्रत्युत्तर
पुणे प्रतिनिधी
20 जुलै
अद्याप पुणे महापालिका निवडणुकीला मुहूर्त लागलेला नसला, तरी एकाच सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या दोन नेत्यांमध्ये पुण्यात होर्डिंग वॉर सुरू आहे. एकाच दिवशी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असल्यामुळे पुण्यात सध्या होर्डिंग वॉर रंगले आहे.
22 जुलै रोजी अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असतो. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून त्यानिमित्ताने होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वर्ष लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग भाजपकडून लावले गेले आहेत, आता राष्ट्रवादी काँग-ेसने या होर्डिंग्जला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिले आहे. सध्या शहरभर या पोस्टर वॉरची चर्चा रंगली आहे.
मागील तीन चार दिवसांपासून पुणे शहरात भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरभर विकासपुरुष या मथळ्याखाली फ्लेक्स लावले जात आहेत. या फ्लेक्सबाजीवरून राष्ट्रवादी काँग-ेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला सुनावले. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना तोंडही फुटले. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात असून, आता राष्ट्रवादी काँग-ेसकडून 22 जुलै रोजी अजित पवार यांचा देखील वाढदिवस असल्यामुळे भाजपच्या फ्लेक्सबाजीला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर देण्यात आले आहे.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी होर्डिंग लावले आहेत. शहरातील राजकीय वर्तुळात या होर्डिंगची चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप-राष्ट्रवादी होर्डिंगवरून आमने-सामने आल्यामुळे हा महापालिका निवडणुकीपूर्वीचा ट्रेलर तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीतदेखील असाच राजकीय धुरळा उडण्याची चिन्ह यानिमित्ताने दिसत आहे.