पुण्याचे शिल्पकार कोण, यावरून रंगले अजित पवार व देवेंद्र फडणवीस पोस्टर वॉर
पुणे प्रतिनिधी
20 जुलै
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. महाराष्ट्राचा गाडा हाकण्यात सध्या या दोन्ही नेत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. योगायोग असा की दोन्ही नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पाहायला मिळत आहे. याचाच पुढचा अंक आता पुणे शहरात पाहायला मिळत आहे, तो पोस्टर वॉरच्या माध्यमातून…
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने तर अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका असल्याने आपला नेता किती पावरफुल आहे, हे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. शहरातील प्रमुख चौकांत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे भलेमोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. भाजपाच्या बॅनरवर पुण्याचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख तर राष्ट्रवादीच्या बॅनरवर कारभारी लय भारी म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्या शहरात या दोन्ही बॅनरची खमंग चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस हे कधीपासून पुण्याच्या विकासाचे शिल्पकार झाले, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.
मागील साडेचार वर्षात सर्व चुकीच्या गोष्टी – जगताप
या विषयी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, की नव्या पुण्याचा शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने भाजपाने फ्लेक्स लावले आहेत. परंतु नवीन पुणे आणि जुने पुणे असा भेद करता येणार नाही. भाजपा सत्तेत असताना पुणेकरांनी मागच्या साडेचार वर्षाच्या काळात सर्व चुकीच्या गोष्टी पाहिल्या आहेत. पुण्याचे खरे शिल्पकार कोण आहेत, पुण्याचे कारभारी कोण आहेत, पुण्याचे विकास पुरुष कोण आहेत, हे पुणेकरांना चांगलेच माहिती आहे. पुण्याचे नेतृत्व अजित पवारच करू शकतात, हे पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत दाखवून देतील.
फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार – बीडकर
भारतीय जनता पार्टीचे पुणे महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर हे मात्र देवेंद्र फडणवीसच पुण्याचे शिल्पकार आहेत, यावर ठाम आहेत. ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शहरात मेट्रोचे जाळे आले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागला, जायका प्रकल्प मार्गी लागला, रिव्हर फ्रन्टसारखा प्रकल्प मार्गी लागला. फडणीसांच्या काळातच महापालिकेने 1000 बस विकत घेण्याचे टेंडर काढले, यातील 600 बस पुणे महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शहरी भागासाठी कशाची गरज आहे, त्याची जाण देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि ते यावर निर्णय घेत असतात. म्हणून देवेंद्र फडणवीस या नव्या पुण्याचे शिल्पकार ठरतात.