उपराष्ट्रपतींनी प्रत्येकाला पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या चळवळीत योद्धा बनण्याचे आवाहन केले

प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची आवश्यकता

नायडू यांनी हवामानाच्या संकटाशी संबंधित वाढत्या प्रतिकूल हवामानविषयक घटनांबद्दल चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली, 16 जुलै 2021

नायडू यांनी हैदराबाद येथील स्वर्ण भारत ट्रस्टमध्ये प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू म्हणाले की, जगाला भेडसावत असलेल्या हवामान विषयक संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने या चळवळीत योद्धा बनायला हवे.

प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि ‘पोल्यूटर पेज’ तत्त्वाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

हिमाचल प्रदेशात अलिकडेच आलेला पूर, उत्तराखंडमधील भूस्खलन आणि कॅनडा आणि अमेरिकेत उष्णतेची  लाट यासारख्या आपत्ती अधोरेखित करताना ते म्हणाले की, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांमुळे हवामानाच्या तीव्र घटनांची वारंवारता वाढल्याची ही उदाहरणे आहेत.

नायडू यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात नुकत्याच वीज पडून झालेल्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की वीज पडण्याच्या वाढलेल्या घटना (मागील वर्षाच्या तुलनेत 2020-21दरम्यान भारतात 34 टक्के अधिक) वैज्ञानिकांनी हवामान संकटाशी जोडल्या आहेत. 

स्वर्ण भारत ट्रस्ट, हैदराबाद येथे प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना उपराष्ट्रपती म्हणाले की या चिंताजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या कल्याणासाठी निसर्गाशी समरसतेने सहकार्य करून पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे.

त्यांनी पॅरिस हवामान कराराबाबत भारताची वचनबद्धता, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बनवण्यातील पुढाकाराचा उल्लेख केला.  आणि हवामानातील बदल कमी करण्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर आणखी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

पर्यावरण आणि आरोग्य कसे एकमेकांत गुंफले आहेत हे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. “अभ्यासातून असे दिसून आले आहे की निसर्गात वेळ घालवल्याने रक्तदाब कमी होतो, तणाव कमी होतो आणि भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होते.

ट्रस्टमधील तरुण प्रशिक्षणार्थीांशी बोलताना नायडू यांनी मुलांमध्ये मायोपियाच्या वाढत्या संख्येविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी एल व्ही प्रसाद नेत्र संस्थामधील तज्ञांशी केलेल्या चर्चेचा संदर्भ दिला. तज्ञांच्या मते 2050 पर्यंत देशातील शहरी भागात राहणाऱ्या 64 दशलक्ष मुलांना मायोपिया होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना, नायडू यांनी सुचवले की चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात नवीन रोजगार बाजारात कौशल्य विकास आणि कौशल्य अद्ययावतीकरण आवश्यक आहे. नवे शिक्षण धोरण  अर्थशास्त्रातील या उदयोन्मुख मागण्यांच्या अनुषंगाने असल्याचे त्यांनी नमूद केले आणि  उद्योगांना  युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी  सरकारच्या सहकार्याने काम करण्याचे आवाहन केले.

एलव्ही प्रसाद आय संस्थेचे संस्थापक जी.एन. राव, एलव्ही प्रसाद आय संस्थेचे ज्येष्ठ नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. प्रशांत गर्ग, स्वर्ण भारत ट्रस्टचे अध्यक्ष चिगुरुपती कृष्ण प्रसाद, मल्लरेड्डी शैक्षणिक संस्थांचे कोषाध्यक्ष  भद्ररेड्डी, स्वर्ण भारत ट्रस्टमध्ये प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि  इतर या कार्यक्रमास उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!