टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेते स्वतः पदक गळ्यात घालणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
15 जुलै
टोक्यो ऑॅलिम्पिक सुरु होण्याची घटिका आता समीप येऊ लागली असून अजूनही करोनाचा धाक कमी झालेला नाही. त्यामुळे करोना संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी ऑॅलिम्पिक मध्ये जे खेळाडू पदकाचे मानकरी होतील त्यांना स्वत:लाच पदक आपल्या गळ्यात घालून घ्यावे लागेल असे समजते. आंतरराष्ट्रीय ऑॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी 339 स्पर्धासाठी पारंपारिक पदक समारंभात मोठा बदल केला गेल्याचा खुलासा केला आहे. टोक्यो मधून कॉन्फरस कॉल वरून आंतरराष्ट्रीय मिडीयाला ही माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार पदक विजेत्या खेळाडूच्या गळ्यात पदक घातले जाणार नाही तर ते ट्रे मध्ये ठेऊन दिले जाईल आणि खेळाडूने स्वत: ते गळ्यात घालायचे आहे. ट्रे नेणारे आणि ट्रे मध्ये पदक ठेवणारे पीपीई किट घालूनच पदाकाला स्पर्श करतील. यामुळे थेट हाताचा स्पर्श पदाकाला होणार नाही. करोना पासून बचावासाठी स्पर्धेत कुणाशीही हस्तांदोलन अथवा गळाभेट घेण्यावर बंदी आहे.
सर्वसामान्यपणे आयओसी सदस्य किंवा खेळ संचालन संस्थेच्या वरिष्ठ अधिकार्याच्या हस्ते विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात पदके घालण्याची प्रथा आहे. ती करोना मुळे बदलली गेली आहे. अधिकारी आणि खेळाडू दोघांनाही पदक ग-हण समारंभात मास्क वापरणे बंधनकारक आहे.