उत्कृष्टता केंद्र – अत्याधुनिक परिवहन तंत्रज्ञान आणि प्रणाली केंद्र (सीएटीटीएस) स्थापन करण्यासाठी भारतीय महामार्ग अभियंता अकादमीने न्यु साउथवेल्स विद्यापीठाशी केला करार
नवी दिल्ली, 15 जुलै 2021
नोएडा इथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणाली केंद्र (सीएटीटीएस) स्थापन करण्यासाठी ,केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय महामार्ग अभियंता अकादमीने (आयएएचई) ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स विद्यापीठासोबत (यूएनएसडब्ल्यू),केलेल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, रस्ते परिवहन आणि महामार्ग आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त ) डॉ. व्ही.के.सिंह , (रस्ते विकास ) विभागाचे महासंचालक आणि विशेष सचिव श्री. आय.के. पांडे, (रसद आणि भारतीय महामार्ग अभियंता अकादमी) चे संयुक्त सचिव श्री. सुमन प्रसाद सिंह, भारतीय महामार्ग अभियंता अकादमीचे संचालक श्री. संजीव कुमार , न्यू साउथ वेल्स विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. इयान जेकब्स, एकात्मिक परिवहन नवोन्मेष संशोधन केंद्राचे संचालक प्रा. विनायक दीक्षित यांच्यासह केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालयाचे , भारतीय महामार्ग अभियंता अकादमी आणि न्यू साउथ वेल्स विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आभासी माध्यमातून झालेल्या एका कार्यक्रमात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
भारतीय महामार्ग अभियंता अकादमीमध्ये अत्याधुनिक परिवहन तंत्रज्ञान आणि प्रणाली केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने क्षमता बांधणी , तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पोषक वातावरण तयार करण्याच्या प्रकल्पासाठी हा करार आहे. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ अद्ययावत परिवहन प्रणाली आणि प्रतिकृती या विषयावर विद्यापीठाचा प्रमाणित अभ्यासक्रमदेखील देणार आहे.
अत्याधुनिक परिवहन तंत्रज्ञान आणि प्रणाली केंद्राची विस्तृत व्याप्ती खालीलप्रमाणे आहे.
1 . महामार्गांच्या संपूर्ण जाळ्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी तत्वतः सिमुलेशन सॉफ्टवेअरचे कोडिंग, मोजणी आणि प्रमाणीकरण तसेच परिस्थिती विश्लेषण यांचा समावेश असणारे भारतासाठी विशिष्ट प्रदीर्घ क्षमता असलेले रस्तेबांधणी मॉडेल (संगणकीय समतोल मॉडेल) न्यू साऊथवेल्स विद्यापीठाद्वारे तयार करण्यात येईल.
2. सिमुलेशन सॉफ्टवेअरचे कोडिंग, मोजणी आणि प्रमाणीकरण तसेच परिस्थिती विश्लेषण याचा समावेश असणारे भारतात रस्ते बांधणीच्या दृष्टीने न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाकडून शहरी विस्तृत डेटा मॉडेल प्राप्त होईल.
3. न्यू साऊथवेल्स विद्यापीठाद्वारे प्रमाणित अद्ययावत परिवहन यंत्रणा आणि प्रतिकृती या विषयावरील अभ्यासक्रम भारतात तीन आणि ऑस्ट्रेलियात तीन कार्यशाळा घेऊन शिकवला जाईल. प्रत्येक कार्यशाळा पाच दिवसांची असेल आणि 40 सहभागींना त्यात भाग घेण्यास अनुमती दिली जाईल.
अत्याधुनिक परिवहन प्रणालीच्या नाविन्य, संशोधन आणि विकासाच्या संधींसह हा करार भारत आणि ऑस्ट्रेलियातील परिवहन क्षेत्रातील उद्योग आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देईल.