पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहमद सोलीह यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद
नवी दिल्ली 14 JUL 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम मोहमद सोलीह यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संवाद झाला.
कोविड महामारी विरोधातल्या लढ्यात भारताचे सहकार्य आणि सहाय्याबद्दल राष्ट्राध्यक्ष सोलीह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मालदीवमध्ये भारताच्या सहकार्याने सुरु असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला आणि कोविड महामारीच्या काळातही अंमलबजावणी वेगाने होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
‘शेजारी सर्वप्रथम’ या धोरणाचा आणि सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन म्हणजेच ‘सागर’ या सागरी दृष्टिकोनाचा मालदीव हा महत्वाचा स्तंभ असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेच्या अध्यक्षपदी परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुला शाहीद यांच्या निवडीबद्दल त्यांच्यासाठीच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.
द्विपक्षीय संबंधांचा आढावा आणि दोन्ही देशातल्या सध्याच्या सहकार्याला गती आणि मार्गदर्शन, उभय नेत्यांमधल्या या संवादामुळे लाभले.