केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराला भेट दिली
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह नवी दिल्लीतल्या जनपथ इथल्या भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराला भेट देऊन रेकॉर्ड व्यवस्थापन,जतन आणि डीजीटायझेशन संदर्भात आढावा घेतला. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव राघवेंद्र सिंग आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराचे महासंचालक चंदन सिन्हा आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संशोधन कक्ष, जुने भांडार, जतन कक्ष आणि जुन्या इमारतीला भेट दिली. भारतीय इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देणाऱ्या, भारत सरकारच्या अतिशय समृध्द आणि उत्तम संग्रहापैकी एक संग्रह पाहण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे रेड्डी म्हणाले.
राष्ट्रीय संग्रहालय हे जगातल्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत संग्रहालयांपैकी एक असून 800 दशलक्ष पृष्ठे , सुमारे 5.7 दशलक्ष फाईल्स आणि 1.2 लाख नकाशांसह इतरही अनेक मौल्यवान संग्रह इथे आहेत. भावी पिढ्यांसाठी या ठेव्याचे जतन करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.