पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

व्हिएतनामचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मोदी यांनी फाम मिन्ह चिन्ह यांचे अभिनंदन केले.  भारत-व्हिएतनाम यांच्यातील सर्वसमावेशक मुत्सद्दी भागीदारी पुढेही अशीच कायम राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती अधिक मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

हिंद महासागर प्रदेशात, मुक्त, सर्वंकष, शांततामय आणि नियमांवर आधातीत व्यवस्था असावी या विचारावर दोन्ही देशांचा ठाम विश्वास असल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळेच, भारत-व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक भागीदारी, प्रादेशिक स्थैर्य, समृद्धी आणि विकासासाठी पोषक ठरेल, अशी आशा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. याच संदर्भात बोलतांना, भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

भारतात कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, व्हिएतनाम सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी व्हिएतनामचे पंतप्रधान चिन्ह यांचे आभार मानले. या महामारीचा सामना करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात यापुढेही परस्पर सहकार्य आणि सल्लामसलत सुरूच ठेवण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी, उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढाव घेतला आणि सहकार्याच्या विविध मुद्यांवर आपले विचार मांडले.

2022 हे वर्ष दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचे 50 वे वर्ष आहे, असे नमूद करत, हे विशेष सुवर्णमहोत्सवी वर्ष, आणि द्विपक्षीय संबंधांमधील मैलाचा दगड गाठल्याबद्दलचे यश विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्याचा मनोदय, दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.

श्री चिन्ह यांनी त्यांना सोयीस्कर असेल, त्यानुसार, भारताचा दौरा करावा, असे आमंत्रण पंतप्रधानांनी दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!