केन्द्र सरकारच्या नोकरभरतीसाठी उमेदवारांची पडताळणी आणि छाननी करण्याकरता देशभरात 2022 च्या सुरुवातीला समान पात्रता परिक्षा घेतली जाणार: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग. सनदी अधिकाऱ्यांच्या नागरी यादी-2021 च्या ई-बूकचे नॉर्थ ब्लॉक इथे केले प्रकाशन
नवी दिल्ली, 6 जुलै 2021
नोकरीसाठी इच्छुक देशभरातील उमेदवारांची 2022 च्या सुरुवातीला समान पात्रता परिक्षा (CET) घेतली जाईल असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पूर्वोत्तर प्रदेशाचा विकास (DoNER), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
केन्द्र सरकारच्या नोकरीत भरती करण्यासाठी उमेदवारांची पडताळणी आणि छाननी करण्याकरता अशी परिक्षा घेण्याचा पहिलाच अनोखा उपक्रम पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या पुढाकाराने या वर्षीच्या अखेरीला घेण्याचे नियोजन होते. परंतु कोविडमुळे याला विलंब होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
सनदी अधिकाऱ्यांच्या नागरी यादी-2021 च्या ईबूकचे नॉर्थ ब्लॉक इथे आज त्यांनी प्रकाशन केले. नोकरीसाठी इच्छुक तरुणांची सहजतेने निवड करण्याच्यादृष्टीने समान पात्रता परिक्षा ही कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने केलेली पथदर्शी सुधारणा आहे. तरुणांसाठी विशेषत: दुर्गम भागात राहणाऱ्यांकरता ही वरदान ठरेल असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. ही क्रांतीकारक सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तरुणांप्रती असेलेली तीव्र संवेदनशीलता, देशभरातील तरुणांना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठीची तळमळ याचे प्रतिबिंब आहे असेही ते म्हणाले.