पंतप्रधान-गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे-जून 2021 दरम्यान महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांना मिळाले मोफत धान्य. नोव्हेंबरपर्यंत अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळाकडे पुरेसा साठा आहे
मुंबई, 5 जुलै 2021
मे-जून 2021 दरम्यान कोविड 19 च्या दुसर्या लाटेच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ (पीएमजीकेवाय) महाराष्ट्रातील जवळपास 7 कोटी आणि गोव्यातील 5.32 लाख लोकांना मिळाला आहे.
पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आघाडीवर असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
मुंबईत पत्रकारांना माहिती देताना के.पी. आशा, महाव्यवस्थापक, एफसीआय, महाराष्ट्र यांनी सांगितले की मे – जून 2021 दरम्यान 3.68 लाख मेट्रिक टन गहू आणि 2.57 लाख मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रासाठी 7 लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आले होते.
सरकारने या योजनेला आणखी पाच महिन्यासाठी मुदतवाढ दिली आहे आणि ही गरज भागवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ एफसीआयने अन्नधान्याची पुरेशा प्रमाणात साठवणूक केली आहे, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक श्री आर पी सिंग यांनी दिली. महामंडळाकडे आधीपासूनच 11.02 लाख मेट्रिक टन गहू आणि 6.65 लाख मेट्रिक टन तांदळाचा साठा आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व महसूल जिल्ह्यांमध्ये अन्नधान्याचा अखंडित पुरवठा करता यावा यासाठी यामध्ये दोन लाख मेट्रिक टन गहू आणि 1.5 लाख मेट्रिक टन तांदळाची भर घालण्यात आली आहे.