राष्ट्रीय रुरबन योजनेंतर्गत होणारे प्रत्येक काम दर्जेदार होण्याची जबाबदारी अधिकारी व ग्रामस्थांची : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 27 : आदर्शगाव म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्नशील राहून, राष्ट्रीय रुरबन योजनेंतर्गत होणारे प्रत्येक काम दर्जेदार होण्याची जबाबदारी अधिकारी व ग्रामस्थांनी चोखपणे पार पाडावी असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजना, जनसुविधा व 2515 योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कृषिमंत्री  दादाजी भुसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी दाभाडीच्या सरपंच सोनाली निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेश निकम, प्रमोद निकम, निळकंठ निकम, निरंकार निकम, डॉ.एस.के.पाटील, भावना निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबध्द असून राष्ट्रीय रुरबन योजनेंतर्गत होणाऱ्या कामात त्रुटी आढळून आल्यास ते काम थांबविण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे. यातील त्रुटी दुर करून गावातील विकास कामे दर्जेदार होण्यासाठी येणाऱ्या अडचणी व समस्या थेट पोहचविण्याचे आवाहन करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, पिण्याचे पाणी, भूमिगत गटारी यांच्यासह सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी जागरूक राहून गावात होणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी हवामान खात्याचा अंदाज घ्यावा

शेतकरी बांधवांनी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट टाळण्यास मदत होईल, असे आवाहन करताना कृषिमंत्री  श्री.भुसे म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा नेहमीचा असून किमान 80 ते 100 मि.मि. पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. उगवण क्षमतेला आवश्यक असलेली पुरेशी ओल लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीस सुरवात करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

कृषी महाविद्यालयांमुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार

एकाच वेळी पाच कृषी महाविद्यालयांना मंजूरी मिळून 650 एकर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या पाच कृषी महाविद्यालयामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, एकाच छताखाली पाच शासकीय कृषी महाविद्यालये साकारण्यात येत असून यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. त्याच बरोबर अजंग-रावळगाव येथील एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून व्यावसायिकांना देखील मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत आदिवासी, मागासवर्गीय शेतकरी बांधवांची शोध मोहिम राबवून वंचित लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या प्रवाहात आणण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी केवळ एक पानी अर्ज  एकाच वेळी सादर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभही लाभार्थ्यांना देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले. राज्यातील सुमारे 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणारी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!