औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

• मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

मुंबई, दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट विहित कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद विभागातील सर्व पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करावेत

रखडलेल्या  व लहान पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी, शाश्वत कार्यरत नळ जोडणीची (functional household tab connection) उद्दिष्ट्ये साध्य करावीत. तसेच नवीन योजनांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करावेत. त्याला मंजुरी घेणे, निविदा काढणे, कार्यादेश देणे ही सर्व कामे विहित मुदतीत करावीत, असे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.

बाह्य स्रोतांद्वारे मनुष्यबळ घ्यावे

काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे/कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

औरंगाबाद विभागात आठ जिल्ह्यांत ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी सुमारे ७ लाख २४ हजार ९०४ कुटुंबांना नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या विभागातील ८ जिल्ह्यांमध्ये जल जीवन मिशन  आराखड्यात एकूण ८ हजार ५९९ गावे व ७ हजार ७९६ योजना प्रस्तावित आहेत व त्याची किंमत सुमारे ३ हजार ८१६ कोटी रुपये आहे अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड यांच्यासह औरंगाबाद विभागातील अधीक्षक अभियंता आणि सर्व कार्यकारी अभियंता बैठकीला उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!