खरिपाचे दुःख विसरता येईना…. नुकसानभरपाईची आशा उराशी बाळगून बळीराजा रब्बीच्या पेरणीत गुंतला. ! !

ओलाव्यामुळे मशागत करण्यात अडचणी.
संपूर्ण परिवाराचे शेतकामात सहकार्य..

सोयगाव प्रतिनिधी – ( बहादुर चव्हाण )

वरूणराजाच्या लहरीपणामुळे नष्ट झालेल्या पिकांच्या निकसानभरपाईची आशा उराशी बाळगून सोयगाव परिसरातील शेतकरी आता रब्बीकडे वळला आहे. परिसरात शेतीच्या कामांना सुरवात झाली असून, सोयगाव परिसरातील शेतकरी काळ्या आईच्या मशागतीच्या व्यस्त झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा आल्याने मशागतीच्या अडचणी येत असून, घरधन्याच्या मदतीसाठी संपूर्ण परिवार शेतात उतरला असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

जोरदार परतीच्या पावसानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयगाव परिसरातील शेतीचे आतोनात नुकसान झाले. ऐन कापणीला आलेले पीक डोळ्यांदेखत मातीमोल झाले. पै-पै जोडून जमवलेले पैसे खरिपाच्या पेरणीच्या गुंतवल्यानंतरही हातात काहीच न आल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. मका, कापूस, उडीद मूग सोयाबीन सगळंच हातातून निसटलं आहे. शासनाकडून नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांकडून मागण्या जोर धरून लागल्यानंतर अखेरीस मदतनिधी जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांच्या ती पदरी कधी पडेल किंवा नाही याची शाश्वती नाही. नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असताना आता समोर रब्बी उभी ठाकली आहे. त्यामुळे मागचे सगळे विसरून शेतकरी आता रब्बीच्या पेरणीच्या कामात गुंतला आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना यावेळी जास्तीच्या पावसाचा फटका बसला आहे. ओल्या दुष्काळामुळे तो पुरता खचला आहे. दरम्यान, सर्व दुःख विसरून शेतकरी आता नव्या जोमाने, नव्या उमेदीने रब्बीच्या पेरणीत गुंतला आहे. सततच्या पावसामुळे सोयगाव परिसरातील शेतजमीन ओलाव्याखाली आली आहे. त्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल अद्यापही तसाच आहे. अशावेळी मशागत करताना शेतकऱ्यांना अडचण होत आहे. चिखल वाळविण्याची प्रतीक्षा केल्यास पेरण्यांमध्ये उशीर होऊन हंगाम हातातून निघून जाण्याचा धोका आहे. पावसामुळे आधीच रब्बीला उशीर झाला आहे. अशात आणखी उशीर झाल्यास ते शेतकऱ्यांना परवडणारे ठरणार नाही. त्यामुळे आहे त्याच परिस्थिती शेतकरी जमेल तशी मशागत करण्यात व्यस्त आहे. तर ज्याठिकाणी पावसाचा कमी फटका बसलेला आहे तेथे पेरणीला सुरवात करण्यात आलेली आहे.

“संपूर्ण परिवार शेतात”
▪जमिनीतील ओलाव्यामुळे मशागतीच्या कामामध्ये अडचणी येत आहेत. खरिपातील नुकसानीचे अवशेष अद्याप शेतभर पसरलेले असल्याने अतिरिक्त कामे वाढली आहेत. पावसामुळे शेतात तणसंख्या देखील वाढले आहेत. अशावेळी घरातील बाया- मुले सर्वचकुंटुब देखील शेतकामामध्ये घरधन्याच्या मदतीला पुढे सरसावल्याचे चित्र सोयगाव परिसरात दिसुन येत आहे. सकाळी स्वयंपाक-पाणी करून महिलावर्ग शेतात मशागत, तण काढणीच्या कामात मदत करत आहेत. यंदा सोयगाव तालुक्यात एकंदरीत हरभरे, गहू , मका, हेक्टरमध्ये यंदा रब्बीचे क्षेत्र असून गहू उत्पादन वाढण्याची शक्यता शेतीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

“पाण्याचा प्रश्न मिटला”
▪शेतीसाठी महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. दरवर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याने शेतीसिंचनात मोठी अडचण येत होती. जिल्ह्यातील पाणीसाठे कोरडेठाक पडल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. सोयगाव परिसरातील सर्वात मध्यमप्रकल्प सहित छोटे पाझरल विहिरी, धरणे सर्व तळाला गेले होते. तरीदेखील बळीराजाने जीवाचे रान करून पिके जगवली. परंतु, निसर्गाने तेही ओरबाडून घेतल्याने तो अडचणीत आला. यंदा मात्र भरपूर पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे तुडुंब भरले असून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा मुख्य प्रश्न मिटलेला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

“नुकसाभरपाईची आशा”
▪खरिपात पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतीकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आस लावून आहे. नुकसानीचे पंचनामे अजून ही झाले नाही आहेत. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, शेतकरी व शेतकरी नेत्यांनी आक्रोश केला होता. त्यामुळे अखेरीस नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. परंतु, जाहीर मदतनिधी तुटपुंजी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे काही का असेना परंतु मदतनिधी लवकरात लवकर मिळावी यासाठीही शेतकऱ्यांचा आग्रह आहे. या मदतीची आशा बाळगून शेतकरी आता नव्या जोमाने रब्बीच्या पेरणीत गुंतला आहे. दरम्यान, मदतनिधी पदरी पडेपर्यंत उधारीवर, कर्ज काढून, नातेवाईकांकडून उसनवारी करून पैसे उभा करून शेतकऱ्यांनी रब्बीच्या कामांना सुरवात केली असू यंदा चांगले उत्पन्न हाती येईल अशी अशा शेतकरी लावून आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!