मुंबई विमानतळावर हेरॉईन जप्त….

मुंबई –

नैरोबीहून मुंबईला शुक्रवारी येणारा एक प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे त्या आधारावर डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पाळत ठेवली.

संशयित प्रवाशाने ग्रीन चॅनेल पार केल्यानंतर त्याची ओळख पटल्यावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला अडवून त्याच्याकडील सामानाची कसून तपासणी केल्यानंतर त्यात भुकटीच्या स्वरुपात 4.98 किलो पांढरट पदार्थ सापडला. चाचणी केल्यानंतर ते हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले.

सामानाच्या ट्रॉली बॅगमध्ये शोधण्यास अत्यंत कठीण अशी एक छुपी पोकळी तयार करून त्यात काळ्या पॉलीथीनच्या पिशवीत भरलेले हेरॉईन फार कल्पकतेने लपविण्यात आले होते.

जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 35 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून या तस्करीच्या पाठीमागे असणारे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे जाळे खणून काढून उद्ध्वस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांचा तपास सुरु आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!