शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे– पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधीदि. 22

रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पध्दतीचा अवलंब करुन आपले उत्पादन वाढवावे. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे सोमवार (21 जून रोजी) कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, तंत्र अधिकारी (पोकरा) संजय पवार, विष्णू भंगाळे, राजेंद्र चव्हाण, कृषिभूषण अनिल सपकाळे, भादली बु. चे सरपंच मिलिंद चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा येथील शेतकरी किशोर चौधरी आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन बीज प्रक्रिया व रुंद सरी वरंबा पध्दतीच्या यंत्राची परिपूर्ण माहिती जाणून घेतली. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना याबाबतचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले. कृषी विभागाच्यावतीने यावेळी आसोदा, भादली बु. येथील शेतकरी गटांना बांधावर खत वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद यांनी तयार केलेल्या रुंद सरी वरंबा पध्दतीच्या व्हिडिओचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कृषी संजीवनी सप्ताहामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी इफको कंपनीमार्फत न्यानो युरिया बाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली याची उपलब्धता जिल्ह्यात पुढील महिन्यापासून होणार असल्याचेही कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!