प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई – दि. 2 –

राज्यातील विविध जिल्ह्यातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (Commen Effluent Tretment Plant) तपासणी करून दुरूस्ती करण्यात यावी. रासायनिक कंपन्या आणि रासायनिक गोदामांचे परीक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करुन महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

मंत्रालयात पर्यावरण व वातावरणीय बदलाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे सह-संचालक व्ही.एम. मोटघरे, प्रधान वैज्ञानिक अधिकारी ए.आर.सुपाते आदिंसह राज्यातील महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले, रसायनयुक्त सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची हानी होत असून, प्रदुषण नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. राज्यात विविध जिल्ह्यात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे असून, त्यांच्या दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव तयार करा, प्रदूषणास आळा बसण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. याचबरोबर घनकचरा, प्लास्टीक, सांडपाणी, अवैध वाहतूक, बायो मेडिकल वेस्ट, अवैध रासायनिक गोदामासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा. शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि नदीच्या होणाऱ्या प्रदुषणास आळा बसण्यासाठी नियमानुसार संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्हा स्तरावर समिती स्थापन करून कार्यवाही बाबत पाठपुरावा करण्यात यावा, असेही राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!