युक्रेनवरुन 182 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान मुंबईत दाखल….
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन साधला संवाद
मुंबई, 01 मार्च 2022 –
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना बुकारेस्टवरुन घेऊन येणारे सातवे विशेष विमान आज सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. अतिशय कठीण प्रसंगातून आल्यामुळे विद्यार्थी दडपणाखाली दिसत होते, आता तुम्ही मायदेशी परत आला आहात, आता काळजी करण्याचे कारण नाही. सर्व विद्यार्थ्यांना सरकार मायदेशी परत आणेल, असे नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
पंतप्रधानांनी भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेत सुलभत यावी, यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवले आहे. त्यामुळे अद्यापही तिथे असलेल्या विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असे नारायण राणे म्हणाले.
मायदेशी परतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुटुंबियांच्या भेटीनंतरचा आनंद दिसून येत होता. मुंबई विमानतळावर विविध राज्यांतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पडेस्कची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सकाळी 7.05 वाजता मुंबई विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल संध्याकाळी 11.10 वाजता मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते.
एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे.