मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे उद्या ध्वजांकन….
जलवाहतुकीला चालना देण्यासाठी बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मुंबईहून बेलापूर, एलिफंटा आणि जेएनपीटीचा प्रवास सुखकर होणार- बंदरे मंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई – दि. १६ –
रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करुन प्रवासी जलवाहतूक सेवा सुरु करण्यासाठी बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे उद्या, दि. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे केंद्रीयमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते ध्वजांकन होणार आहे, अशी माहिती बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
बेलापूर जेट्टी येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, बंदरे मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचेसह खासदार राजन विचारे आणि विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, बाळाराम पाटील, रमेश पाटील आणि श्रीमती मंदा म्हात्रे, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतुकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे ८.३७ कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याचेही बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. वॉटर टॅक्सी सेवेमुळे निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुद्धा जोडणी मिळणार आहे तर नवी मुंबईमधून थेट एलिफंटा येथे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार असल्याने पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे, असेही मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.
बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये असून कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी २९० रुपये इतके भाडे ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरे व खाड्यांमधून दरवर्षी सुमारे दीड कोटी प्रवासी जलवाहतूकीद्वारे प्रवास करतात. जलवाहतूकीचा पर्याय हा किफायतशीर, इंधन व वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणस्नेही आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या प्रचंड वाहतूक असलेल्या शहरांसाठी तसेच हळूहळू अलिबागपर्यंत विस्तारत जाणाऱ्या लोकवस्तीसाठी रस्ते व रेल्वे वाहतूकीला पर्याय म्हणून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर जलवाहतूक सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.