गोव्यात आयफेल टॉवरच्या धर्तीवर झुआरी पुलावरील दर्शक गॅलरी विकसित केली जाणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

राज्यासाठीची वार्षिक योजना 2,000 कोटी रुपयांवरुन 5,000 कोटी रुपये करण्यात आल्याची गडकरींची माहिती

1250 कोटी रुपयांच्या नवीन रस्त्यांना आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मंजूरी

पणजी, 02 नोव्हेंबर 2021

गोव्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची वार्षिक योजना 2,000 कोटी रुपयांवरुन 5,000 कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी यांनी आज राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायाकडून 2014 पासून राज्यात सागरमाला आणि भारतमाला प्रकल्पांतर्गत 25,000 कोटी रुपयापेक्षा अधिक कामे करण्यात आली आहेत.

झुआरी नदीवर निर्माणाधीन असलेल्या पूलाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, पूलावर टोलनाक्यासाठी अधिग्रहित केलेली जागा रेस्टॉरंट आणि पेट्रोलपंप, गॅसस्टेशन या कामासाठी देण्यात येईल. तसेच या पुलावर आयफेल टॉवरच्या धर्तीवर दर्शक गॅलरी निर्माण करण्यात येणार आहे. या गॅलरीसंबंधी आराखडा पूर्ण झाला असून 15 डिसेंबरच्या आत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. निर्माणाधीन झुआरी पुलाच्या एका बाजूच्या कामाचे उद्घाटन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
 

दर्शक गॅलरीसमवेतच विकसित करणाऱ्या रेस्टॉरंट आणि फूड मॉलमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने येण्यासाठी सुविधा असेल. फूड मॉलमध्ये स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

मोपा विमानतळासाठीच्या जोड रस्त्याचे काम ताबडतोब सुरु करण्यासंबंधी निर्देश देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. सुमारे सात किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 1200 कोटी रुपये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय खर्च करणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चार नव्या टप्प्यांच्या कामाची घोषणा केली. यात नावेली ते कुंकळी हा साडेसहा किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 24 हेक्टर भूमी अधिग्राहण करण्यात आले असून यासाठी 270 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच काणकोण बाह्य वळण रस्ता ते पोळे हा 8 किलोमीटर रस्ता सुमारे पावणे दोनशे कोटी रुपये खर्च करुन निर्माण केला जाणार आहे. संजीवनी साखर कारखाना, धारबांदोडा ते खांडेपार रस्त्यासाठी 200 कोटी रुपये आणि फोंडा ते भोमा या चौपदरी रस्त्यासाठी 575 कोटी रुपये अशा  आज एकूण 1250 कोटी रुपयांच्या कामाला मंजूरी देण्यात आली.

नौवहन मंत्रालयाने सागरमाला प्रकल्पातून मुरगाव बंदरासाठी मंजूर केलेले ड्रेजिंगचे काम सध्या अपूर्ण आहे, लवकरच हे काम पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. तसेच इलेक्ट्रॉनिक कलस्टर, औषधनिर्मिती कारखाने, मासेमारीसाठी स्वतंत्र जागा (फिशींग हार्बर) या कामांचा डिपीआर पूर्ण झाला आहे, ही कामे लवकरच मार्गी लागतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

राज्याच्या चौफेर विकासासाठी अनेक योजना मंजूर केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्रा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण आणि पारिस्थितिकी याची काळजी घेऊन विकासकामे हाती घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन विकासावर भर दिला जात आहे. लवकरच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय गाड्यांचे हॉर्न सुमधूर करणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.  

पेट्रोल आणि डिझेल आयातीवर होणारा प्रचंड खर्च टाळण्यासाठी फ्लेक्स इंजिन निर्माण करण्यासंदर्भात वाहन उत्पादकांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!