काळजी घ्या; लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा धोका कायम, संशोधनातून माहिती समोर
नवी दिल्ली
देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव कमी होताना दिसतोय. मात्र बर्याचदा कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. द लांसेटनं केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.
इतकंच नाही तर अशा लोकांपासून कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका 38 टक्के असतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, जर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर एकमेकांपासून संसर्ग होण्याचा धोका 38 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
संशोधनात असे आढळून आलं आहे की, सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत लंडन आणि बोल्टनमध्ये एकूण 440 कुटुंबांची पीसीआर चाचणी करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता खूपच कमी होती. मात्र ती पूर्ण संरक्षण देण्यात अपयशी ठरली आहे. संशोधनाशी संबंधित इम्पीरियल कॉलेज लंडनचे प्रोफेसर अजित लालवानी म्हणाले, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग होत आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत प्रत्येकाचं लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाचा धोका कायम राहणार आहे.
तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, हिवाळ्यात कोरोनाचा धोका आणखी वाढतो. हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक लोक घरातच असतात. अशा परिस्थितीत एकमेकांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोकाही वाढतो. अशा वेळी घरातील प्रत्येक सदस्याला कोरोनाची लस घेणं आवश्यक आहे.
सह-संशोधक डॉ. अनिका सिंगनयागम यांनी म्हटलं की, या संशोधनातून हे स्पष्ट झालं की कोरोनाचे डेल्टा प्रकार झपाट्याने का वाढत आहे. जगातील मोठी लोकसंख्या अजूनही लसीपासून दूर आहे. ज्या देशांमध्ये मोफत लस दिली जात आहे, तेथेही लोक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. पण कोरोनाचा धोका नक्कीच कमी झाला आहे पण संपलेला नाही. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, साबणानं वारंवार हात धुणे यासह इतर खबरदारी बाळगावी.