स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व विविध शासकीय उपक्रमांच्या प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करावे : माहिती व जनसंपर्क सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे
नाशिक विभागाचा घेतला आढावा
नाशिक दिनांक 29 ऑक्टोबर 2021 :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित राज्यभर विविध कार्यक्रम सुरू आहेत. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या विविध उपक्रमांबाबत जिल्हास्तरावर कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांच्या तसेच शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने विभागीय व जिल्हास्तरावरून प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महांसचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या आहेत.
नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे बोलत होते. या बैठकीस नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत (नाशिक), विलास बोडके (धुळे), माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती सहायक जयश्री कोल्हे, मनोहर पाटील, किरण डोळस, प्रविण बावा आदि उपस्थित होते.
यावेळी सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरेपट्टे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी, त्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकांनाही उपस्थित रहावे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासकीय पत्र व्यवहार आणि बातम्या, लेख प्रसिद्ध करतांना तयार करण्यात आलेल्या लोगोचा वापर प्राधान्याने करण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर लेख लिहिणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारीत पुस्तिका अथवा कॉफीटेबल बुक तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यात यावी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांबाबत लेख लिहून प्रसिद्धी देतांना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनांचे सहकार्य घ्यावे. तसेच जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत काही घटना, आंदोलने, मेळावे अथवा लढे उभारले असतील त्याविषयीचा इतिहास जाणून घेऊन त्याबाबत देखील लेखांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याचे नियोजन ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात यावे, असेही सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त गेल्या दोन वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त करून त्याबाबत यशकथा, लेख तयार करण्यात यावेत. त्यांची वृत्तपत्रे व विविध समाजमाध्यमांद्वारे त्यांस व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचनाही सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी यावेळी दिल्या आहेत.
यावेळी विभागातील तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच भविष्यातील प्रसिद्धीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या नियोजनाचे सादरीकरण विभागाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे यांनी केले. तसेच सचिव तथा महासंचालक यांचे स्वागत व बैठकीचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले.