दिवसा आणि रात्री करोनाची वर्तणूक वेगळी, नवा खुलासा

नवी दिल्ली,

जगाला गेली जवळजवळ दोन वर्षे वेठीला धरलेल्या करोना कोविड 19 बाबत आता नवी सनसनाटी माहिती एका अध्ययनातून समोर आली आहे. करोना चाचणी रिपोर्ट संदर्भात एक धक्कादायक बाब उघड झाली असून त्यानुसार करोना साठी दिवसा आणि रात्री केलेल्या चाचण्याचा रिपोर्ट वेगवेगळा येतो असा दावा संशोधकांनी केला आहे. अमेरिकेच्या वोंडरबिल्ट विद्यापीठातील मेडिकल सेंटर मध्ये झालेल्या अध्ययनात करोना विषाणू वेळ आणि व्यक्तीच्या बॉडी क्लॉकच्या हिशोबाने वेगवेगळी वर्तणूक करतो असा दावा केला गेला आहे.

दिवसा आणि त्यातही दुपारी जर करोना संक्रमणसंदर्भात चाचणी केली गेली असेल तर संक्रमणाची अधिक अचूक माहिती मिळाण्याची शक्यता दुप्पट असते असे संशोधकांना दिसून आले. या वेळी केलेल्या चाचणीत फॉल्स निगेटिव्ह रिपोर्ट येण्याची शक्यता कमी होते असे त्यांचे म्हणणे आहे. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे संक्रमण असूनही नेगेटिव्ह रिपोर्ट येणे. यामुळे असे संक्रमित आसपासच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात कारण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गर्दीत वावरताना योग्य ती खबरदारी घेतली जात नाही आणि त्यामुळे असे लोक अन्य लोकांना संक्रमित करू शकतात.

अर्थात यापूर्वीही अनेक बॅक्टेरीया व्यक्तीच्या बॉडी क्लॉक प्रमाणे ( म्हणजे झोप किंवा जागे राहणे) या नुसार वेगळा रिपोर्ट दर्शवितात असे लक्षात आले होते. दिवसा व्यक्ती जागी असते त्यामुळे तिची इम्यून सिस्टीम जास्त सक्रीय असते आणि या काळात संक्रमित पेशींमधून रक्त व लाळेत विषाणूचे कण येण्याची गती किंवा वेग अधिक असतो. याला व्हायरस शेडींग असे म्हटले जाते. व्हायरस शेडींग वेगवान असले तर योग्य रिपोर्ट मिळू शकतो असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

यामुळे आता करोना चाचणी आणि करोना उपचार पद्धती मध्ये नवीन प्रकारची पद्धत वापरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे. दुपारच्या वेळात व्हायरस शेडींग जास्त असल्याने ही वेळ विषाणू प्रसाराच्या दृष्टीने संवेदनशील आहे असाही दावा केला गेला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!