मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच
मुंबई,
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अशातच अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या प्रकरणी दररोज नवनवे दावे करत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामाही टिवटरद्वारे जारी केला आहे. अशातच याप्रकरणी समीर वानखेडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच आहे, असं म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी एबीपी माझाला माहिती देताना म्हटलं आहे की, ‘हो, मी मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं कारण माझ्या आईची तशी इच्छा होती. माझी आई जन्मानं मुस्लिम होती आणि तिनं माझ्या वडलांशी लग्न करून हिंदू धर्म स्वीकारला होता. मी सेक्युलर व्यक्ती आहे. मी ईदही साजरी करतो आणि दिवाळीही साजरी करतो. मी मंदिरातही जातो आणि मशिदीतही जातो. मी आईच्या इच्छेनुसार, मुस्लिम धर्माच्या रितीप्रमाणे लग्न केल्यानंतर स्पेशल मॅरेज एक्टप्रमाणे लग्न रजिस्टर केलं आहे. म्हणून हा काही गुन्हा झाला का?‘ पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, ‘माझ्याविरोधात केले जात असलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. मी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू होतो आणि आताही हिंदू आहे. मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानं मी मुस्लिम होतो का?‘
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी त्यांचे वडील आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जारी केले आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये समीरचे वडील मेहर जातीतील आहेत. जे एण् मध्ये येते. समीर वानखेडे यांनी कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर प्रत, कौटुंबिक फोटो शेअर केले असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रात छेडछाड केली नसल्याचे सांगितले आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्या टिवटरवर शेअर केलेले प्रमाणपत्र हे वानखेडेचे मूळ जन्म प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. त्याचवेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मंत्र्यांच्या या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी मुंबईत येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, वास्तविक नवाब मलिक यांनी काल सोशल मीडियावर दोन टवीट केले होते. पहिल्या टवीटमध्ये त्यांनी वानखेडेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलिक यांनी लिहिले की ओळखा कोण आहे? तर दुसर्या टवीटमध्ये त्यांनी महापालिकेच्या प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला आहे. या प्रमाणपत्रात समीरच्या वडिलांचे नाव ’दाऊद क वानखेडे’ असे लिहिले आहे. ज्यामध्ये धर्माच्या जागी ’मुस्लिम’ असे लिहिले आहे. मात्र, या प्रकरणी वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप करत मी कधीही धर्म बदलला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याने आंतरजातीय विवाह केला होता. परंतु, त्याने किंवा त्याच्या पत्नीने कधीही धर्मांतर केले नाही.