शिक्षण विभागाचा लहरी कारभार शालेय सुट्ट्यांमध्ये कपात
सावदा (प्रतिनिधी) –
दिवाळी सणासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी कालावधी जाहीर केला होता. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली आहे. शिक्षण विभागाचा सुट्टयांचा घोळ कायम असून दिवाळी सुट्टीचा कालावधी बदलण्यास शिक्षक भारतीने आक्षेप घेतला आहे. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्याचे सहसचिव राजेंद्र पवार यांच्या सहीने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आज ऐनवेळी दिवाळी सणाच्या सुट्टी कालावधीत २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
ग्रामीण भागातील शाळा या जुलै पासून तर शहरी भागात जरी शाळा ४ ऑक्टोबर ला सुरू झाल्या असल्या तरी त्यांचे ऑनलाईन वर्ग १५ जून पासूनच सुरू होते. त्या मुळे, पूर्वीचे सुट्टीचे नियोजन लक्षात घेऊन शिक्षक विद्यार्थी व पालकांनी मूळगावी जाण्यासाठी केलेले नियोजनही बिघडणार आहे. शिक्षक भारतीने शिक्षण विभागाच्या या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांना पत्राद्वारे दिवाळी सुट्टीचा कालावधी ऐनवेळी न बदलता पूर्ववत ठेवावा, अशी मागणी केली आहे. शिक्षण विभागातील अधिकारी १नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा सुट्टीचा कालावधी जाहीर करतात आणि ऐनवेळी मंत्रालयातून सुट्टी कालावधीत बदल केला जातो. हा काय प्रकार आहे ? या प्रकरणाने पुन्हा एकदा शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर आल्याचे शिक्षक भारतीने म्हटले आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केल्यानुसार राज्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मूळगावी जाण्याचे आरक्षण केले आहे. ऐनवेळी सुट्टी कालावधीत बदल केल्यास सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागेल. शिक्षक भारती संघटनेने दिवाळी सुट्टी पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभागाच्या अशा लहरी कारभारामुळे सर्व शिक्षक आणि संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.