न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार? समोर आली मोठी माहिती
दुबई,
आयसीसी टी20 विश्वचषकात टीम इंडियाच्या ’मिशन विश्वचषका’ला पहिल्याच सामन्यात हादरा बसला आहे. सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर टीम इंडियातल्या काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन आणि त्याआधी झालेल्या सराव सामन्यातही हार्दिक पांड्याला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. आता भारताचा पुढचा सामना 31 ऑॅक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे. त्याआधी हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे, पण अंतिम अकरामध्ये त्याला संधी मिळणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही.
नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे गोलंदाजी केली नव्हती. शिवाय फलंदाजीतही त्याला सूर सापडलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने 8 चेंडूत अवघ्या 11 धावा केल्या. वेगवान गोलंदाजांचा सामना करताना त्याला अडचण होत होती. यातच एक आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्या खांद्यावर आदळला होता. यानंतर त्याच्या खांद्याचं सिटी स्कॅन करण्यात आलं. याचा रिपोर्ट आला असून दुखापत फारशी गंभीर नसल्याचं टीम मॅनेजमेंटने म्हटलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला आणखी 5 दिवसांचा अवधी आहे. या कालावधीत हार्दिक पूर्ण फिट असेल असं टीम मॅनेजमेंटने म्हटलं आहे. पण सध्याचा त्याचा फॉर्म पहाता त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कितपत संधी मिळेल याबाबत साशंकता आहे.
खांद्याच्या दुखापतीमुळे गेल्या अनेक सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजी केलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केवळ फलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पण या सामन्यात हार्दिकला मोठी कामगिरी करता आली नाही. अशात हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून शार्दुल ठाकूरचं नाव पुढे येत आहे.
विकेट टेकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शार्दुल फलंदाजीतही माहिर आहे. आयपीएल 2021 मध्ये शार्दुलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं होतं. शार्दुलने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना 16 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.
31 तारखेला ’करो या मरो’
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा दुसरा सामना तगड्या न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. टी20 विश्वचषकातील आपलं आव्हान टीकवण्यासाठी भारतासाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं.