विनामास्क फिरणार्‍या मुंबईकरांकडून 77 कोटींचा दंड वसूल

मुंबई,

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 37 लाख 23 हजार 19 नागरिकांवर कारवाई करत 77 कोटी 37 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 572 दिवसांत 37 लाख 23 हजार 19 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत 77 कोटी 37 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने 30 लाख 63 हजार 881 नागरिकांवर कारवाई करत 64 कोटी 16 लाख 52 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी 6 लाख 35 हजार 247 नागरिकांवर कारवाई करत 12 कोटी 70 लाख 49 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये 23 हजार 891 नागरिकांवर कारवाई करून 50 लाख 39 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अँटोबॉडीज निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!