बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील, फडणवीसांचा राज्य सरकारला टोला
मुंबई,
महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षांपासून विकास नव्हे फक्त भ-ष्ट्राचार करत आहे. हे सरकार इतकं लबाड आहे की काही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. मी तर असे म्हणेल की, यांच्या बायकोनं मारलं तरी यात केंद्राचा हात आहे असं म्हणतील, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केली. ते नांदेडमधील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
मागील दीड वर्षांत राज्याने अनेक नैसर्गिक संकटं पाहिली. वादळं, महापूर, अतिवृष्टी यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. याची झळ राज्यातील शेतकर्यांना बसली. पण या शेतकर्यांना पिकविम्याचे पैसेही व्यवस्थित दिले गेले नाही. हे सरकार लबाड आहे. काहीही झालं की केंद्राला जबाबदर धरतं, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतली. देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोट-निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ कुंडलवाडी, बिलोली आणि देगलूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले ही उपस्थित राहाणार होते. आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा आणि नुकसान भरपाई हा भाजपचा प्रमुख मुद्दा असल्याचं पोटनिवडणुकीतील प्रचारावरुन दिसतेय. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली.
राज्यातील सरकारला अद्याप पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. संपूर्ण राज्यासाठी फक्त 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. आपलं सरकार होतं तेव्हा मराठवाड्याच्या एका जिल्ह्याला 500 कोटी रुपयांची मदत केली होती. राज्य सरकार भ-ष्टाचार करत आहे. हे लबाड सरकार आहे. भागवत कराड यांनी विमा कंपन्याची बैठक घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. विमा कंपन्यानी त्यांना सांगितलं की, राज्य सरकारनं त्यांच्या वाट्याचे सतराशे कोटी रुपये भरले नाहीत. तर आम्ही कसे पैसे देऊ. राज्य सरकारने आपल्या वाट्याचे पैसे भरले असते तर आम्ही 4 हजार कोटी रुपये दिले असते. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.