आर्यन खान प्रकरणावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची एनसिबी वर टीका; मलिक म्हणाले, ’सत्याचाच विजय होईल’
मुंबई,
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं गेलं. नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीच्या तपास कार्यावरही संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात आता किरण गोसावीच्या बॉडिगार्डनं धक्कादायक खुलासा केला आहे. एबीपी माझाशी बोलताना एनसीबी कारवाईचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, ’आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली. यामधील 8 कोटी समीर वानखेडे यांना देण्यात आले.’ प्रभाकर साईल यांच्या धक्कादायक खुलास्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
या प्रकरणाचा तपास सुमोटो पद्धतीने महाराष्ट्र पोलिसांच्या पथकानं करायला हवा. यावर महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. आताच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर तात्काळ कठोर कारवाई करायला हवी. नवाब मलिक कालपर्यंत सांगत होते, त्याची चेष्टा भाजप नेते करत होते. या कटकारस्थानामध्ये भाजपचा संबध आहे का? हे पाहावं लागेल. केंद्राच्या एजन्सी महाराष्ट्रात येतात आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. याप्रकरणी राज्य सरकारने कारवाई करावी. एनसीबीच्या प्रत्येक कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.
गोसावीमार्फत पैशांची वसुली – नवाब मलिक
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी सातत्यानं एनसीबीच्या कार्यवाहीवर आक्षेप घेतला होता. आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर मलिक म्हणाले की, मी आधीपासूनच बोलत होतो. समीर वानखेडे जेव्हापासून एनसीबीमध्ये आले तेव्हापासून खोट्या कारवाया करत आहेत. चित्रपटश्रृष्टीला टार्गेट करुन प्रसिद्धी मिळवायची. यामाध्यमातून मोठं वसूली रॅकेट उभं राहिलं होतं. हे आधीपासून सांगत होतो. हा विषय समोर आल्यानंतर निश्चितपणे गंभीर विषय आहे. गोसावीच्या माध्यमातून पैसे वसूली सुरु झाली आहे. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली पाहिजे. एखादं एसआयटी पथकं नेमूण वसूल रॅकेट संपवायला हवं.
समीर वानखेडे काय म्हणाले?
एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांनी केलेल्या सर्व आरोपाचं खंडन केलं. आज, सायंकाळी चार वाजता पत्रकार परीषद घेऊन ते या प्रकरणावर आपली बाजू मांडणार आहेत.