भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर आफ्रिदीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला…
मुंबई,
टी 20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच कोण जिंकणार यावर सध्या सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. दुबईतील मैदानावर रात्री साडे सात वाजता ही मॅच सुरू होणार आहे. जुना रेकॉर्ड आणि सध्याचा फॉर्म पाहता या मॅचमध्ये भारताचं पारडं जड आहे, असं अनेकांच मत आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आघाडीवर असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं ही मॅच कोण जिंकणार यावर मत व्यक्त केलं आहे.
पाकिस्तानमधील ’समा टीव्ही’ शी बोलतना आफ्रिदीनं ही मॅच सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानची शरणागती मान्य केली आहे. ’दोन्ही टीम अनुभवी आहे. टीम गेल्या 10-15 वर्षाांपासून चांगलं क्रिकेट खेळत आहे. त्यांच्या बोर्डानंही टीम इंडियात मोठी गुंतवणूक केली आहे. ही मॅच मन आणि डोकं या दोन्ही प्रकारावर खेळली जाईल. यामध्ये भारताचं पारडं जड आहे. ती टीम बाजी मारेल.
आफ्रिदी पुढे म्हणाला की, टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना 100 टक्के योगदान द्यावं लागेल. घाबरण्याची काही गरज नाही. दबावावर मात करावी लागेल. खेळाडूंना खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. मॅच संपल्यानंतर हॉटेलमध्ये जाताना आपण थोडं अधिक चांगलं खेळू शकलो असतो याचा विचार येता कामा नये. निर्णयाची काळजी न करता संघर्ष करा,’ असा कानमंत्र पाकिस्तानच्या खेळाडूंना आफ्रिदीनं दिला.
वर्ल्ड कप मॅचमध्ये टीम इंडियाचं पारडं आजवर नेहमीच जड आहे. 1992 च्या वर्ल्ड कपपासून ही भारताच्या विजयाची मालिका सुरू झाली आहे. ती आजपर्यंत नॉन स्टॉप सुरू आहे. वन-डे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा 7 वेळा पराभव केलाय. तर टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 वेळा विजय मिळवला आहे. दोन्ही वर्ल्ड कपमध्ये मिळून भारत-पाकिस्तानमध्ये एकूण 12 मॅच झाल्या असून या सर्व मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत.