केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील विकासकामांचा सखोल आढावा
नवी दिल्ली, 18 जून 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे जम्मू आणि काश्मीरमधील विविध विकासकामांचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलेल्या ‘पारदर्शकतेने विकास’ या घोषवाक्याला अनुसरून ही विकासकामे राबवली जात आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या 90 टक्के व्याप्तीची त्यांनी प्रशंसा केली. त्याचवेळी अमित शाह यांनी नायब राज्यपाल आणि त्यांच्या टीमचे जम्मू आणि काश्मीरमध्ये 76 टक्के आणि चार जिल्ह्यांमध्ये 100 टक्के लसीकरण केल्याबद्दल अभिनंदन केले.
पंचायती राज संस्था आणि स्थानिक शहरी संस्थांच्या बळकटीकरणासाठी तातडीने या संस्थांच्या सदस्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, त्यांच्यासाठी बसण्याची योग्य व्यवस्था करावी आणि या संस्थांचे कामकाज सहजतेने चालावे यासाठी आवश्यक ती उपकरणे आणि इतर सामग्री उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर देशाच्या विविध भागांना भेट देऊन देशातील पंचायतींमध्ये सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घ्यावी असे निर्देशही त्यांनी पंचायत सदस्यांना दिले.
अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा योजनेची व्याप्ती वाढवण्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी भर दिला. त्याबरोबरच शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कृषी आधारित उद्योग सुरू करावा, असे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंदांच्या उत्पादनांचा दर्जा आणि घनता वाढवण्यासाठी काम केले पाहिजे जेणेकरून सफरचंद उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगला भाव मिळू शकेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000/- रुपये जमा करणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि किसान क्रेडीट कार्ड योजना इत्यादी योजनांसारख्या योजनांचे फायदे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याची खातरजमा करावी, असे निर्देश त्यांनी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाला दिले.