देवगाव त्रिफुलीची पडझड..प्रवाशांची परवड..
त्र्यंबकेश्वर – प्रतिनिधी: ( पांडुरंग दोंदे )
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव फाटा हा प्रवासाच्या मानाने अत्यंत महत्वाचा फाटा असून येथे सा.बां. विभागाची त्रिफुली आहे. येथून देवगाव- खोडाळा – वाडा, देवगाव- घोटी- इगतपुरी, देवगाव- त्र्यंबकेश्वर- नाशिक असे महत्वाचे मार्ग जातात. या फाट्यावरुन इगतपुरी आगारासह पालघर,वाडा,जव्हार या आगाराच्या लांब पल्ल्याच्या बसेस धावतात. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव व सुर्यमाळ – वाडा मार्गावर पावसाळ्यात अतिपाऊस झाल्याने या मार्गावर भुस्खलन झाल्याने या मार्गावरील बससेवा बंद आहे.तसेच इगतपुरी आगाराच्याही काही बसेस बंदच आहेत.या फाट्यावरुन खाजगी वाहनेही रोज धावतात. खाजगी वाहने व प्रवाशी यांची देवगाव फाट्यावर रोजची वर्दळ असते.
देवगाव फाट्यावरुन प्रवाशी व वाहनचालकांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा म्हणून सा.बां.विभागाने देवगाव फाट्यावरील त्रिफुलीवर येथून गेलेल्या वेगवेगळ्या मार्गांची कि.मी. अंतरासह व दिशादर्शक बाणांसह प्रवाशी व वाहनचालकांना समजेल अशी सविस्तर माहिती दर्शवली होती.मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून या त्रिफुलीवरील सर्व माहिती नष्ट झाली. यानंतर तिची दुरवस्था होऊन सुमारे दोन वर्षांपापुर्वी ही त्रिफुली पडून गेली आहे. यामुळे येथून पुढील प्रवास करताना प्रवाशी वाहनचालक व विशेषकरून नवीन प्रवाशी व वाहनचालक यांना त्रिफुलीवरुन योग्य माहिती मिळत नसल्यामुळे मोठी फसगत व परवड होत आहे.या त्रिफुलीकडे सा.बां.विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे प्रवाशी, वाहनचालक व नागरिकांतून सांगितले जात आहे. सा.बां. विभागाच्या मनमानी कारभाराबाबत प्रवाशी, नागरिक व वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तरी सबंधित सा.बां. विभागाने देवगाव त्रिफुली नवीन बांधण्याची मागणी प्रवाशी, नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.