धोक्याची घंटा वाजली ! चीन आणि रशियामध्ये कोरोनाचा लॉकडाऊन पुन्हा लागू
बिंजिंग,
चीन आणि रशियामधून पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून परतलेल्या कोरोनाने जगभरातील देशांना चिंतेत टाकलं आहे. तर रशियामध्येही कोरोना प्रसार वेगाने वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. वर्ष 2019 मध्ये चीनच्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला होता. वूहानमधून तो झपाट्याने आधी चीनच्या अनेक प्रांतात आणि मग जगभरात पसरला होता. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत आहे.
चीनमध्ये सातत्याने वाढणार्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता आता चीन सरकारने तातडीने पावले उचलायला सुरूवात केली आहे. आपत्कालीन उपाययोजनांचा भाग म्हणूनच आता चीनमध्ये फ्लाईटस रद्द केल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले जात आहेत. जगभरात चीनमधूनच कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले होते. आता पुन्हा चीनमध्ये आढळलेल्या कोरोनाने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीन प्रशासनाकडून आता तातडीने उपाययोजना करायला सुरूवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनच चीनने मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करायला सुरूवात केली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे. तर पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये बाहेर देशातून येणार्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास प्रशासनाने म्हटलं आहे. तर चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरात कोरोनाचे संक्रमण हे अतिशय वेगाने पसरत असल्याची माहिती आहे.
रशियात कोरोनाची पुन्हा लाट –
कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेला प्रसार पाहता रशिया खूपच त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना भरपगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच लोकांनाही घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी, 28 ऑॅक्टोबरपासून राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 30 ऑॅक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत देशात लॉकडाऊन असेल. देशात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे संसर्ग खूप जास्त आहे.
काय आहे कोरोना विषाणू?
श्वसनप्रणालीमार्फत विविध प्रकारचे कित्येक विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. या विषाणूंमुळे आपल्याला सर्दी, पडसे आणि तत्सम आजार होऊ शकतात. कोरोना व्हायरस हा विषाणूंच्या एका नवीन श्रेणीशी संबंधित आहे. कोरोनाचे अनेक व्हेरिएंट आहेत. कप्पा, डेल्टा, डेल्टा प्लसनंतर लॅम्बडा व्हेरिएंट असे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रसार कमी करण्यासाठी वेळेवर व जास्तीत जास्त चाचण्या करण्यात येत असून बचावासाठी लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोनावर लस शोधण्यात अनेक देशांना यश आले असून जगभरात विविध लसींनी लसीकरण सुरू आहे.